भगवान श्री गणेशाचे संपूर्ण अवतार माहिती | Jai shri Ganesh | Ganpati | विघ्नहर्ता

भगवान श्री गणेशाचे संपूर्ण अवतार माहिती | Jai shri Ganesh | Ganpati | विघ्नहर्ता 


जो ओंकाररुपी श्री गणेश भगवान वेदादी शास्त्रांत वास करतो. ज्याचे स्मरण इंद्र...
आदी देव आणि मुनी हृदयात करतात. ब्रम्हा.... विष्णू... महेश... इंद्रदेव 
ज्याचे पूजन करतात. 

जो संपूर्ण सृष्टीचा हेतू आणि कारणांचे कारण आहे. ज्याच्या आज्ञेने ब्रह्मदेव
सृष्टी निर्माण करतात...  विष्णू भगवान तिचे पालन करतात... आणि 
शंकर भगवान तिचा संहार करतात.
 
सूर्य अवकाशात संचार करतो.... नक्षत्र भूमीवर पडतात आणि ज्याच्या आज्ञेनेच वायू वाहतो.... 
पाणी दाही दिशांत वाहते. अशा ओंकारस्वरुप श्रीगणेशाने असुरांचा संहार करण्याकरीता खालीलप्रमाणे अवतार घेतल्याचे दिसून येते.भगवान-श्री-गणेशाचे-संपूर्ण अवतार-माहिती-Jai-shri-Ganesh-Ganpati-विघ्नहर्ता-मोरया-गजानन-लंबोदर-गणराया-गणपती
भगवान-श्री-गणेशाचे-संपूर्ण अवतार-माहिती-Jai-shri-Ganesh-Ganpati

 
वाचकांनो ही पोस्ट थोडी मोठी झालेली आहे... तरीही आग्राहाची विनंती आहे,
भगवान श्री गणेशाचे संपूर्ण अवतार जाणून घेण्यासाठी पूर्ण वाचावे.
 

श्री गणेश पुराणानुसार भगवान श्री गणेशाचे अवतार

 

१)    कृतयुग :-

आदिती व कश्यप यांच्या उदरी विनायक या नावाने जन्म घेऊन
देवांतक आणि नरांतक यांचा वध केला. हा अवतार दशभुजा... सिंहारुढ....
आणि रक्तवर्णी होता.
 

२)    त्रेतायुग :- 

माता पार्वतीच्या उदरी जन्म घेऊन मयुरेश्वर या नावाने सिंधूसुराचा
वध केला.
हा अवतार सहा भुजांचा असून मोरावर बसलेला असून श्वेतवर्णी होता.
 

३)    द्वापारयुग :-

 ब्रह्मदेवाच्या जांभईतून निर्माण झालेल्या सिंधूसुराचा नाश करण्यासाठी भगवान श्री गणेशाने गजानन या नावाने चार भुजांचा अवतार घेतला.
त्यांच्या युद्धात असुराने श्री गणेशाला नर्मदा नदीत फेकून दिल्यामुळे नर्मदेचे पाणी तांबडे झाले. गजाननाने सिंधूसुराचा वध करुन त्याचे रक्त अंगाला लावले तेव्हापासून भगवान श्री गणेशाला शेंदूर लावतात. या अवतारात वाहन उंदीर असून गजानन रक्तवर्णी होते.
 

४)    कलियुग :-

 दोन भुजा व धुम्रकेतू नाव असलेला हा अवतार झाला त्याचे वाहन
 घोडा होते. हा अवतार धूम्रवर्णी होता.

           श्री मुद्गल पुराणानुसार असुरांच्या संहाराकरीता भगवान श्री गणेशाचे अष्टावतार

         (१) मत्सरासुरासाठी - वक्रतुंड
     (२) मदासुरासाठी - एकदंत
         (३) तारकासुरासाठी - महोदर
          (४) लोभासुरासाठी - गजानन
       (५) क्रोधासुरासाठी - लंबोदर
      (६) कामासुरासाठी - विकट
        (७) ममासूरासाठी - विघ्नराज
      (८) अहृमसुरासाठी – धुम्रवर्ण

 
पुराणांचा वेध घेतला असता... भगवान शंकरांनी एकोणीस अवतार तर श्री विष्णू भगवानांनी
चोवीस अवतार घेतल्याचे दिसून येते. भगवान श्री गणेशाने देखील असुरांचा नाश
करण्याकरीता अनेक अवतार घेतल्याचे पुराणात उल्लेख आहे.

मुद्गल पुराणानुसार भगवान गणेशाने आठ प्रमुख अवतार घेतले आहेत. 
भगवान श्री गणेशाने हे अष्टावतार त्रिलोकास असुरांच्या त्रासापासून 
मुक्त करण्यासाठी घेतलेले आहेत. 

गणेशाने घेतलेले अवतार व त्या अवतार कार्यात संहार केलेले असुर यांचा
तपशिल खालीलप्रमाणे आहे :-

१. वक्रतुंड अवतार मत्सरासुराच्या संहारासाठी

२. एकदंत अवतार मदासुराच्या संहारासाठी

३. महोदय अवतार तारकासुराच्या संहारासाठी

४. गजानन अवतार लोभासुराच्या संहारासाठी

५. लंबोदर अवतार क्रोधासुराच्या संहारासाठी

६. विकट अवतार कामासुराच्या संहारासाठी

७. विघ्नराज अवतार ममासुराच्या संहारासाठी

८. धुम्रवर्ण अवतार अहमासुराच्या संहारासाठी

 
या अष्टावतारामध्ये भगवान श्री गणेशाने कोणत्याही असुराचा वध केलेला नाही.
याउलट असुरांमध्ये असलेल्या दुर्गुणांचा नाश करुन त्यांना सरळ मार्गावर आणले
आणि आपल्या अंकित ठेवल्याचे दिसून येते.


भगवान-श्री-गणेशाचे-संपूर्ण अवतार-माहिती-Jai-shri-Ganesh-Ganpati-विघ्नहर्ता-मोरया-गजानन-लंबोदर-गणराया-गणपती
भगवान-श्री-गणेशाचे-संपूर्ण अवतार-माहिती-Jai-shri-Ganesh-Ganpati

श्री वक्रतुंडावतारा

 
वक्रतुण्डावताराश्च देहिनां ब्रह्मधारकः |
मत्सरासुरहन्ता स सिंहवाहनगः स्मृतः ||
 
(अर्थ :- श्रीगणेशाचा वक्रतुंडावतार हा ब्रम्हांडस्वरुप सर्व देहांना धारण करणारा,    
मत्सरासुराचा संहारक आणि सिंह या वाहनावर आरुढ असा आहे. )

भगवान श्री गणेशाने अष्टावतारापैकी वक्रतुंडहा पहिला अवतार मत्सरासुर या 
राक्षसाच्या संहाराकरीता घेतला होता.

देवराज इंद्रादेवच्या आर्शीवादाने मत्सरासुर राक्षसाचा जन्म झाला.
हा मत्सरासुर शिवभक्त होता त्याने दैत्यगुरु शुक्राचार्य यांच्याकडून भगवान
शंकरांची शिव पंचाक्षरी (ॐ नमः शिवाय) दीक्षा प्राप्त करुन
कठोर तपश्चर्या सुरु केली.

त्याच्या तपश्चर्येवर भगवान शंकर प्रसन्न झाले आणि त्यांनी मत्सरासुरास वरदान 
मागण्यास सांगितले. मत्सरासुराने अभय होण्याचे वरदान मागितले आणि भगवान
शंकरांनी त्यास इच्छित वरदान दिले.
 
वरदान प्राप्त होताच मत्सरासुराने पृथ्वी, स्वर्ग आणि पाताळ या त्रिलोकांवर आक्रमण केले 
आणि या युद्धात वरुणराज, कुबेर व यमदेवांचा पराभव झाला. मत्सरासुर तिन्ही लोकांचा 
अधिपती झाला.

मत्सरासुरास सुंदरप्रिय व विषयप्रिय हे दोन पुत्र होते. आपले दोन्ही पुत्रांच्या मदतीने 
मत्सरासुराने सगळीकडे अत्याचार सुरु केला. सर्व देवी देवता भयभीत झाले व 
त्यांनी भगवान शंकरांकडे धाव घेतली.

भगवान शंकरांनी सर्व देवी देवतांना सांगितले की... मत्सरासुराचा पराभव हा
भगवान श्री गणेशाकडून वक्रतुंडया अवतारात होणार आहे. त्यामुळे आपण सर्व
मिळून भगवान श्री गणेशाची आराधना करुयात.यावर सर्व देवी देवतांनी मिळून 
मत्सरासुराच्या त्रासातून मुक्त होण्यासाठी भगवान श्री गणेशाची एकाक्षरी मंत्राद्वारे 
आराधना केली.

त्यांच्या आराधनेवर संतुष्ट होऊन भगवान श्री गणेश वक्रतुंड अवतारात प्रकट झाले
आणि म्हणाले, आपण सर्व निश्चिंत रहा. गर्विष्ट मत्सरासुराच्या त्रासातून मी 
आपली निश्चितच मुक्तता करेन.

वक्रतुंडाने आपल्या सर्व गणांसहीत मत्सरासुराच्या नगरीस घेराव घातला आणि दोन्ही 
सैन्यांमध्ये घनघोर युद्धास सुरुवात झाली. मत्सरासुर आणि वक्रतुंड या दोघांमध्ये
तसेच दोघांच्या सैन्यांमध्ये सलग पाच दिवस युद्ध सुरु होते.
 
वक्रतुंडाच्या गणांनी मत्सरासुराच्या सुंदरप्रिय व विषयप्रिय या दोन पुत्रांचा वध केला.
 
पुत्रांच्या निधनाने मत्सरासुर व्याकूळ झाला आणि वक्रतुंडास अपशब्द वापरू लागला.
त्यावर वक्रतुंडाने विराट रुप धारण केले आणि मत्सरासुरास सुनावले....

मत्सरासुरा... तुला जर तुझे प्राण प्रिय असतील तर मला शरण ये अन्यथा 
तुलाही तुझ्या प्राणास मुकावे लागेल.

वक्रतुंडाच्या भयानक रुपास पाहून मत्सरासूर गर्भगळीत झाला. त्याला कळून चुकले
की आता आपला अंत निश्चित आहे. तेव्हा मत्सरासुराने वक्रतुंडापुढे शरणागती पत्करली 
आणि भितीपोटी घाबरुन जाऊन अत्यंत विनयपूर्वक गणेशस्तुती गाऊ लागला व वक्रतुंडाकडे अभय मिळावे म्हणून प्रार्थना करु लागला.

त्याच्या प्रार्थनेवर संतुष्ट होऊन वक्रतुंडाने मत्सरासुरास अभय प्रदान केले व पुढील आयुष्य शांततेत घालविण्याकरीता पाताळात जाण्याची आज्ञा केली. वक्रतुंडाच्या आज्ञेप्रमाणे त्याने पाताळाकडे गमन केले. हाच मत्सरासुर पुढे गणपती भक्त झाला. मत्सरासुराच्या त्रासातुन 
मुक्त झालेल्या सर्व देवदेवतांनी देखील वक्रतुंडाची स्तुती करुन आभार मानले.

त्रैलोक्यावर विजय मिळविलेल्या आणि मत्सरामुळे सर्व देवदेवतांना त्रास देणाऱ्या 
असुराच्या मत्सराचा नाश करुन त्यास सरळ मार्गावर आणणाऱ्या भगवान वक्रतुंडांस 
प्रणाम असो....!

भगवान-श्री-गणेशाचे-संपूर्ण अवतार-माहिती-Jai-shri-Ganesh-Ganpati-विघ्नहर्ता-मोरया-गजानन-लंबोदर-गणराया-गणपती
भगवान-श्री-गणेशाचे-संपूर्ण अवतार-माहिती-Jai-shri-Ganesh-Ganpati


श्री एकदंतावतारा

एकदंतावतारौ वै देहिना ब्रह्मधारकः |
मदासुरस्य हन्ता स आखुवाहनगः स्मृतः ||

( अर्थ : भगवान श्री गणेशाचा एकदंत अवतार हा ब्रम्हांडस्वरुप सर्व देहांना धारण करणारा
मदासुर संहारक आणि उंदिर या वाहनावर आरुढ असा आहे )
 
भगवान श्री गणेशाने अष्टावतारापैकी एकदंतहा दुसरा अवतार मदासुर या राक्षसाच्या संहाराकरीता घेतला होता. 

महर्षी च्यवन यांनी आपल्या तपश्चर्येने मदासुर या दैत्यास निर्माण केले. पुढे हा मदासुर अत्यंत बलवान व पराक्रमी असा दैत्य च्यवनपुत्र म्हणून ओळखला जाऊ लागला. मदासुरास समस्त ब्रह्मांडावर राज्य करण्याची प्रबळ इच्छा होती. याकरीता त्याने दैत्यांचे गुरु शुक्राचार्य यांचेकडे जाऊन आपली इच्छा व्यक्त केली. 

शुक्राचार्यांनी मदासुरास आपले शिष्य बनवून घेतले व प्रकृतीच्या (देवी शक्तीच्या) 
एकाक्षरी मंत्राची दिक्षा दिली. मदासुराने शक्तीची दीक्षा घेतली व तो जंगलात
तपश्चर्येसाठी निघून गेला. मदासुराने घोर तपश्चर्या सुरु केली.

मदासुराची कठोर तपश्चर्या खूप वर्षे सुरूच राहिली. त्याच्या संपूर्ण  शरीरावर मुंग्यांनी 
वारुळे तयार केली. त्याच्या आसपास वृक्षवेली तयार झाल्या. त्यानंतर त्याच्या 
तपश्चर्येवर देवी प्रकृती प्रसन्न झाली व तिने मदासुरास सदैव निरोगी राहण्याचे व 
ब्रह्मांडावर राज्य करण्याचे वरदान दिले.

मदासुराने सर्वप्रथम संपूर्ण पृथ्वीवर आपले साम्राज्य प्रस्थापित केले. त्यानंतर त्याचे 
स्वर्गाकडे धाव घेतली.... आणि इंद्रदेवांस पराभूत करुन स्वर्ग देखील काबीज केले. 
त्यानंतर त्याने प्रमदासुर या दैत्याच्या सालसा नामक कन्येशी विवाह केला.


दैत्यकन्या सालसेल हिला तीन पुत्र झाले. मदासुराने कैलासपती महादेवांसही पराजित केले. 
आता मदासुराचे त्रिलोकावर शासन प्रस्थापित झाले. मदासुराने सगळीकडे हाहाकार 
माजविण्यास सुरुवात केली. त्रिन्ही लोकांना त्याने जेरीस आणले.

शेवटी सर्व देवीदेवता भगवान श्री गणेशास शरण गेले व त्यांनी मदासुराच्या त्रासापासुन 
मुक्ती मिळण्यासाठी भगवान श्री गणेशाची आराधनेस सुरुवात केली. 
त्यांच्या तपश्चर्येस शंभर वर्षे पूर्ण झाल्यानंतर भगवान श्री गणेश त्यांचे समोर एकदंत या अवतारामध्ये प्रकट झाले. 

एकदंताचे स्वरुप अत्यंत भयानक होते, भव्य शरीर व हातात परशु, पाश अशी आयुधे 
असून ते उंदरावर स्वार होते. एकदंताने देवीदेवतांना मदासुरापासून मुक्तीचे वरदान दिले.

इकडे नारदमुनींनी मदासुरास सुचित केले की एकदंताने सर्व देवीदेवतांना वरदान दिलेले 
आहे व आता एकदंत तुझा अंत करण्याकरीता तुझ्याशी युद्ध करणार आहेत. 
हे समजताच मदासुर क्रोधाने भडकला व आपल्या सर्व सैन्य घेऊन एकदंताशी युद्ध 
करण्यास निघाला.

मदासुर व एकदंत युद्धासाठी एकमेकांना सामोरे आले. एकदंताने मदासुराच्या दूताकडे 
निरोप पाठविला, “तुला जर जिवंत रहायचे असेल तर देवदेवतांचा द्वेश करणे बंद कर
त्यांचे राज्य त्यांना परत कर. तू जर असे केले नाहीस तर तुझा अंत निश्चित आहे.” 

हे एकून मदासुर क्रोधान युद्धास सरसावला. त्याने आपल्या धनुष्यावर बाण सरसावला पण तेवढयात एकदंताचा परशू मदासुरास येऊन लागला व मदासुर बेशुद्ध पडला. 
शुद्धीवर आल्यावर मदासुरास कळून चुकले की एकदंत म्हणजेच सर्वसामर्थ्यशाली 
परमात्मा आहेत. 

मदासुर एकदंतास शरण आला. मदासुराने एकदंताची क्षमा मागितली आणि भगवान 
श्री गणेशाची दृढ भक्ती आपणांस प्राप्त व्हावी यासाठी त्यांची स्तुती करु लागला.

एकदंताने मदासुरावर प्रसन्न होऊन सांगितले की, “माझी भक्ती करायची असेल तर 
यापुढे जिथे माझी पूजा-अर्चना चालू असेल तिथे तू अजिबात जायचे नाहीत. 
यापुढे तू पाताळात जाऊन रहा.त्यानुसार मदासुर पाताळात निघून गेला व 
सर्व देवीदेवता आनंदाने एकदंताचा जयजयकार व गणेशस्तुती करु लागले.

त्रैलोक्यावर विजय मिळविलेल्या, मदाने उन्मत्त झालेल्या आणि सर्व देवीदेवतांना 
त्रास देणाऱ्या असुराच्या द्वेशाचा नाश करुन त्यास सरळ मार्गावर आणणाऱ्या 
एकदंतास प्रणाम असो....!

भगवान-श्री-गणेशाचे-संपूर्ण अवतार-माहिती-Jai-shri-Ganesh-Ganpati-विघ्नहर्ता-मोरया-गजानन-लंबोदर-गणराया-गणपती
भगवान-श्री-गणेशाचे-संपूर्ण अवतार-माहिती-Jai-shri-Ganesh-Ganpati

श्री महोदरावतारा

महोदर इति ख्यातो ज्ञानब्रहृमप्रकाशक: |
मोहासुरस्य शत्रुर्वै आखुवाहनगः स्मृतः ||


अर्थ : भगवान श्री गणेशाचा महोदर अवतार हा ब्रहृमज्ञान प्रकाशक असुन,  
मोहासुर संहारक आणि उंदिर या वाहनावर आरुढ असा आहे )

भगवान श्री गणेशाने अष्टावतारापैकी महोदरहा तिसरा अवतार मोहासुर या राक्षसाच्या संहाराकरीता घेतला होता. तारकासुर नामक दैत्यराज सर्व देवीदेवतांना आणि ऋषि-मुनींना 
त्रास देत होता. 

सर्व धार्मिक कार्यांमध्ये विघ्न निर्माण करत हाता. त्यामुळे जप, तप आणि यज्ञांसारखी 
धार्मिक कार्यांमध्ये बाधा निर्माण होत होती. तारकासुराच्या कृत्यांमुळे सर्व ऋषि-मुनी 
हैराण झाले होते. त्यावेळी महादेवांच्या आर्शिवादाने त्यांचा पुत्र कार्तिकेय याने असुरांचा 
राजा तारकासुर याचा वध केला.

तारकासुराच्या वधाने असुरांवर मोठे संकट निर्माण झाले. दैत्यांना त्यांचे हक्क मिळवून 
देण्यासाठी कोणत्या असुरास दैत्यराज पद बहाल करावे या विचाराने दैत्यगुरु शुक्राचार्य 
यांना ग्रासले. 

मोहासुर नामक एक पराक्रमी राक्षस दैत्यगुरु शुक्राचार्यांचा शिष्य होता. शुक्राचार्यानी 
त्यास दैत्यराज पद बहाल करता येऊ शकते असा विचार केला व त्यास तपश्चर्या करण्यास सांगितले.
 
दैत्यगुरुंच्या आज्ञेनुसार मोहासुराने सुर्यदेवांची कठोर तपश्चर्या केली व सुर्य देवास प्रसन्न 
करुन घेतले. सुर्य देवांकडून मोहासुराने सर्वत्र विजयी होण्याचे वरदान मिळविले. 
वरदान मिळताच मोहासुर दैत्यगुरु शुक्राचार्यांकडे आला व त्यांना हकीकत सांगितली.  
शुक्राचार्यांनी मोहासुरास दैत्यांचा राजा घोषीत केले व त्याचा राज्यभिषेक देखील केला.

मोहासुराने आपल्या पराक्रमाने त्रिलोकांवर विजय मिळविला. तिन्ही लोकांवर मोहासुराचे 
राज्य प्रस्थापित झाले, सगळीकडे हाहाकार माजला. सुर्यदेवांच्या वरदानामुळे उन्मत्त झालेला मोहासुर सर्वांना त्रास देऊ लागला. त्याच्या भयाने त्रिलोकांमधील सर्व देवदेवता आणि
 ऋषि-मुनी घाबरुन गेले. 

सुर्य देवांच्या वरदानामुळे मोहासुरास सर्वत्र विजय प्राप्त होत आहे त्यामुळे मोहासुराच्या 
त्रासातून मुक्ती मिळविण्यासाठी सर्व देवीदेवता आणि ऋषि-मुनी सुर्य भगवाना कडे गेले. 
त्यांना मोहासुराच्या जाचातून सुटका होण्याचा मार्ग विचारला.

सुर्यदेवांनी त्या सर्वांना भगवान श्रीगणेशाच्या एकाक्षरी मंत्राद्वारे गणेशाची आराधना 
करण्यास सांगितले. 

मोहासुराच्या त्रासातून त्रिलोकांना वाचविण्यासाठी सर्व देवीदेवता आणि ऋषि-मुनी 
भगवान श्री गणेशाची आराधना करु लागले. त्यांच्या तपश्चर्येवर संतुष्ट होऊन 
भगवान श्री गणेश महोदर या अवतारात प्रकट झाले. 

सर्वांनी श्रीगणेशाची मनोभावे स्तुती केली व मोहासुराच्या त्रासातुन त्रिलोकांस मुक्तता 
मिळवून द्यावी अशी याचना केली. सर्वांना मोहासुराच्या त्रासातून निश्चितच मुक्त करेन 
असे आश्वासन देऊन महोदर उंदिरावर स्वार होऊन मोहासुराशी यु्द्ध करण्यास 
रवाना झाले.

इकडे देवर्षी नारद मुनींनी ही बातमी मोहासुरापर्यंत पोचविली आणि महोदराच्या अनंत 
पराक्रमी़, दिव्य आणि अनंतकोटी ब्रहृमांडे ज्याच्या उदरात सामावली आहेत अशा 
महोदराच्या स्वरुपाबाबतही सांगितले. 

दैत्यगुरु शुक्राचार्यांनी देखील मोहासुरास महोदरास शरण जाण्याबाबत सुचित केले. 
तेवढयात महोदराचा दूत म्हणून भगवान विष्णू मोहासुराकडे आले व त्यास म्हणाले
असुरराज मोहासुर, मी अनंत पराक्रमी भगवान महोदर यांचा दूत आहे. तुम्ही 
महोदरास शरण जाऊन त्रिलोकांस धर्मपूर्वक जीवन व्यतीत करण्यामध्ये 
कोणतीही बाधा आणणार नाही असे वचन दिल्यास भगवान महोदर तुम्हाला 
क्षमा करतील. जर तुम्ही त्यांना शरण नाही गेलात तर मात्र युद्धभुमीवर तुमचा 
बचाव असंभव आहे.हे ऐकताच मोहासुराचा अहंकार नष्ट झाला. 

त्याने भगवान विष्णूंना सांगितले की, “तुम्ही भगवान महोदरांना आमच्या नगरात 
आणून त्यांच्या दर्शनाचा लाभ आम्हांस करुन द्यावा.यावर भगवान महोदराने 
मोहासुराच्या नगरीत प्रवेश केला.

मोहासुराने महोदरांचे यथोचित स्वागत केले. त्यांच्या स्वागताला पुष्पवृष्टी केली... 
त्यांना वाजत गाजत महालात आणले. त्यांची श्रद्धापूर्वक पूजा-अर्चा करुन 
स्तुती केली. 

आपल्याकडून झालेल्या अपराधांची क्षमायाचना केली. भगवान विष्णूंनी सांगितल्याप्रमाणे मोहासुराने त्रिलोकांस धर्मपूर्वक जीवन व्यतीत करण्यामध्ये कोणतीही बाधा आणणार 
नाही असे वचन महोदरास दिले. त्याच्या भक्तीवर प्रसन्न होऊन महोदराने मोहासुरास 
अभय दिले, त्याच्या अपराधांना क्षमा केली. मोहासूराने महोदरास वचन दिल्याप्रमाणे 
देवीदेवता आणि ऋषि-मुनी यांना त्रास देणे बंद केले. सर्व धार्मिक कार्ये निर्विघ्नपणे 
पार पडू लागले. सगळीकडे आनंदाचे वातावरण निर्माण झाले.

त्रैलोक्यावर विजय मिळविलेल्या, मोहाने उन्मत्त झालेल्या आणि सर्व देवदेवता व 
ऋषि-मुनींना त्रास देणाऱ्या असुराच्या मोहाचा नाश करुन त्यास सरळ मार्गावर 
आणणाऱ्या महोदरास प्रणाम असो.....!

भगवान-श्री-गणेशाचे-संपूर्ण अवतार-माहिती-Jai-shri-Ganesh-Ganpati-विघ्नहर्ता-मोरया-गजानन-लंबोदर-गणराया-गणपती
भगवान-श्री-गणेशाचे-संपूर्ण अवतार-माहिती-Jai-shri-Ganesh-Ganpati

श्री गजाननावतारा

गजानन: स विज्ञेय: सांख्येभ्य: सिद्धिदायक: |
लोभासुरप्रहर्ता वै आखुगश्च: प्रकीर्तिता: ||

अर्थ : श्रीगणेशाचा गजानन हा अवतार संख्याब्रहृमधारक म्हणजेच असंख्य योग्यांना 
सिद्धी प्रदान करणारा असुन, लोभासुर संहारक आणि उंदिर या वाहनावर आरुढ 
असा आहे )

भगवान श्री गणेशाने अष्टावतारापैकी गजाननहा चौथा अवतार लोभासुर या राक्षसाच्या संहाराकरीता घेतला होता.

धनाधिपती कुबेर एकदा भगवान शंकर आणि देवी पार्वती यांच्या दर्शना करीता कैलास 
पर्वतावर गेले होते.. शंकर पार्वतीचे दर्शन घेत असतांना देवी पार्वतीच्या सौदर्याने मोहित 
झाले आणि तिच्याकडे एकटक बघू लागले

हे बघून देवी पार्वती अत्यंत क्रोधीत झाली. तिचा क्रोध लक्षात घेऊन धनाधिपती कुबेर 
भितीने थरथर कापू लागले

आता आपल्यास देवीच्या क्रोधास सामोरे जावे लागणार या भितीने कुबेर गर्भगळीत झाले 
व त्या क्षणी त्याच्या शरीरातून एक लोभासुर नामक दैत्य निर्माण झाला.

लोभासुर हा दैत्य असल्यामुळे तो शंकर - पार्वतीस प्रणाम करुन दैत्यकुळाचे गुरु शुक्राचार्य यांच्याकडे निघून गेला. 
लोभासुर अत्यंत पराक्रमी होता. शुक्राचार्यांनी आपणांस दीक्षा प्रदान करावी या हेतूने 
तो शुक्राचार्यांना विनंती करु लागला. दैत्यगुरु शुक्राचार्यांनी त्याच्या विनंतीस मान दिला 
व त्याला आपले शिष्य बनवून घेतले. शुक्राचार्यांनी लोभासुरास भगवान शंकरांच्या 
पंचाक्षरी मंत्राची दीक्षा प्रदान केली व शिवकृपा प्रात्प करण्यासाठी तपश्चर्या करण्यास 
वनात निघून जाण्याचा आदेश दिला.

गुरुंच्या आदेशाप्रमाणे लोभासुराने वनात जाऊन अन्नपाणी त्याग करुन.... अंगावर 
भस्म धारण करुन शिव शंभोच्या कठोर तपश्चर्येस सुरुवात केली. त्याच्या अनंत कालपर्यंत चालणाऱ्या कठोर तपश्चर्येवर भोलेनाथ प्रसन्न झाले व लोभासुराससमोर प्रकट झाले. 

त्यांनी लोभासुरास वरदान मागण्यास सांगितले. लोभासुराने महादेवांकडून त्रिलोकांपासुन 
निर्भय होण्याचे वरदान मिळविले. तिन्ही लोकांपासून निर्भयतेचे वरदान प्राप्त होताच लोभासूर उन्मत्त झाला. 

त्याने सर्व दैत्यांना एकत्र करुन अतुल्य सैन्यसेना तयार केली व तिन्ही लोकांवर आक्रमण 
केले. पृथ्वीवरील सर्व राजांना पराभूत करुन वर्चस्व प्रस्थापित केले. स्वर्गाकडे आगेकूच 
करुन इंद्रास पराभूत केले व स्वर्गही काबीज केला. 

पराभूत इंद्रदेवाने मदतीकरीता श्री विष्णूं भगवानांकडे धाव घेतली. श्री विष्णूं भगवानांनी दैत्यांविरोधात युद्ध पुकारले. लोभासुर व श्रीविष्णू भगवान यांच्यामध्ये घनघोर युद्ध झाले. 
पण महादेवांच्या निर्भयतेचे वरदान लाभलेल्या लोभासुरापुढे विष्णूंचेही काही चालले नाही. 
आता लोभासुराने कैलासाकडे कूच करण्याचे ठरविले आणि महादेवांना आपल्या दूता कडून 
निरोप पाठविला.... हे महादेवा, मला आपणाकडून प्राप्त निर्भयतेच्या वरदानाचे स्मरण 
व्हावे. या वरदानामुळे मी तिन्ही लोकांवर विजय मिळविण्यास सक्षम झालो आहे. 
तुम्ही देखील या पराक्रमी लोभासुराशी युद्ध करण्यास सज्ज व्हा अथवा कैलास 
सोडून निघून जा.महादेवांना आपण दिलेल्या वरदानाचे सामर्थ्य ज्ञात असल्यामुळे 
ते कैलास सोडून तपश्चर्येकरीता वनात निघून गेले.

तिन्ही लोकांवर विजय मिळविल्यावर लोभासुराच्या आनंदाला पारावार राहिला नाही. 
आपण जगजेत्ता झालो या अहंकाराने त्याने सर्वत्र अराजक माजविले. देवीदेवता, ब्राहृमण
ऋषिमुनी यांना त्रास देऊन हैराण केले. 

सगळीकडील धार्मिक यज्ञयाग, पुजा-अर्चना आदींवर अंकुश आणला. सर्व धर्म-कर्म बंद झाले. 
या परिस्थितीतून मार्ग काढण्याकरीता चिंतातूर देवदेवता, ब्राहृमण, ऋषिमुनी हे विश्वामित्रांचे 
पुत्र, आचार्य रैभ्य यांच्याकडे गेले. 

रैभ्यमुनींनी सर्वांनी गजाजनाची आराधना करण्यास सांगितले. विघ्नहर्ता भगवान 
श्री गणेशच या परिस्थितीतून आपणासर्वांनी बाहेर काढू शकतात त्यामुळे सर्वांनी 
भगवान श्री गणेशाची आराधना करावी, असा सल्ला रैभ्य मुनींनी सर्वांनी दिला. 

त्यांच्या सल्ल्यानुसार सर्वांनी भगवान श्री गणेशाची मनोभावे आराधना केली. त्यांच्या 
आराधनेवर प्रसन्न होऊन श्री गणेश उंदरावर स्वार होऊन गजाजन अवतारात प्रकट झाले 
व त्यांनी सर्वांना लोभासुराच्या त्रासातुन मुक्त करण्याचे आश्वासन दिले.

लोभासुराने महादेवांची भक्ती करुन त्यांना प्रसन्न करुन घेतले व त्यांच्या वरदानामुळेच 
तो उन्मत्त झाला होता. जगजेत्ता झाल्यामुळे कोणाचेही म्हणणे ऐकून वा समजून घेण्याच्या मनस्थितीत नसलेला उन्मत्त लोभासुर हा केवळ भगवान शंकरांचे म्हणणे निश्चित ऐकून घेईल 
या विचाराने गजाननाने लोभासुराशी बोलणी करण्याकरीता महादेवांना विनंती केली.

गजाननाच्या विनंती नुसार महादेव लोभासुराकडे आले. लोभासुराने महादेवांना प्रमाण केला. महादेवांनी लोभासुरास गजाननाचा निरोप दिला, “गजाननापुढे तुझा पराजय निश्चित 
आहे. तू गजाननास शरण ये अथवा युद्धासाठी सज्ज हो.पुढे महादेवांनी त्यास 
गजाननाची महती सांगितली आणि त्यास शरण जाणे लोभासुरासाठी कसे कल्याणकारक 
आहे हेही पटवून दिले. 

असंख्य योग्यांना सिद्धी प्राप्त करुन देणारा एकमेव मार्ग म्हणजे गजाननास शरण जाणे 
हा आहे. एवढे सांगून महादेव निघून गेले.

इकडे दैत्यगुरु शुक्राचार्यांनी देखील लोभासुरास गजाननास शरण जाण्याचाच सल्ला दिल्ला. लोभासुराने गजाननास शरण जाण्याचा निर्णय घेतला व गणेशस्तुती गाऊन भगवान गणेशाची 
भक्ती करु लागला. त्याच्या भक्तीवर प्रसन्न होऊन गजानन प्रकट झाले. लोभासुराने 
गजाननाकडे आपल्या अपराधांना क्षमा करण्याची याचना केली. 
त्यास क्षमा करुन गजाननाने पातालात गमन करण्याचा आदेश दिला. लोभासुर 
गजाननास वंदन करुन पातालात निघून गेला. लोभासुराने माजवलेले अधर्म, अनिती आणि अत्याचार संपुष्टात आल्याने सर्वत्र आनंदाचे वातावरण निर्माण झाले. 
तिन्ही लोकांमध्ये गजाननाचा जयजयकार होऊ लागला.

त्रैलोक्यावर विजय मिळविलेल्या, लोभाने उन्मत्त झालेल्या आणि सर्व देवदेवता व ऋषि-मुनींना 
त्रास देणाऱ्या असुराच्या लोभाचा नाश करुन त्यास सरळ मार्गावर आणणाऱ्या 
भगवान गजाननास प्रणाम असो......!

भगवान-श्री-गणेशाचे-संपूर्ण अवतार-माहिती-Jai-shri-Ganesh-Ganpati-विघ्नहर्ता-मोरया-गजानन-लंबोदर-गणराया-गणपती
भगवान-श्री-गणेशाचे-संपूर्ण अवतार-माहिती-Jai-shri-Ganesh-Ganpati

श्री लंबोदरावतारा

लम्बोदरावतारो वै क्रोधासुरनिबर्हणः ।
शक्तिब्रह्माखुगः सद् यत् तस्य धारक उच्यते: ||

(अर्थ :- भगवान श्री गणेशाचा लंबोदर हा अवतार शक्ती ब्रहृमधारक तथा सत्स्वरुप असुन
क्रोधासुर संहारक आणि उंदिर या वाहनावर आरुढ असा आहे )

भगवान श्री गणेशाने अष्टावतारापैकी लंबोदरहा पाचवा अवतार क्रोधासुर या 
राक्षसाच्या संहाराकरीता घेतला होता.

समुद्रमंथनाच्या वेळी श्रीविष्णूं भगवानांनी अत्यंत सुंदर असे मोहिनीरुप धारण केले होते. 
श्री विष्णू भगवान मोहिनी रुपात इतके रुपवान दिसत होते की.... सर्व देव व दैत्य यांना 
त्यांच्या रुपाची भुरळ पडली होती. 

भगवान शंकर देखील श्री विष्णूंच्या मोहिनी रुपावर भाळले. श्रीविष्णूंनी जेव्हा मोहिनी रुपाचा 
त्याग केला तेव्हा भगवान शंकर अत्यंत नाराज झाले. वस्तुस्थिती लक्षात येता
महोदव अत्यंत क्रोधीत झाले व क्रोधामुळे त्यांच्या शरीरातून एक दैत्य निर्माण झाला. 
त्या दैत्याचा रंग अत्यंत काळा असून डोळे तांबूस रंगाचे होते.

हा दैत्य, दैत्यगुरु शुक्राचार्यांकडे गेला. शुक्राचार्यांनी आपणांस दीक्षा प्रदान करावी या हेतूने 
तो त्यांना विनंती करु लागला. 

दैत्यगुरु शुक्राचार्यांनी त्याच्या विनंतीस मान दिला व त्याला आपले शिष्य बनवून घेतले. महादेवांच्या क्रोधामुळे हा दैत्य निर्माण झाला असल्यामुळे शुक्राचार्यांनी या दैत्याचे नाव
क्रोधासुरअसे ठेवले व शांबर नामक दैत्याची लावण्यवती कन्या प्रिती हिच्यासमवेत त्यांनी क्रोधासुराचा विवाह देखील लावून दिला. 

क्रोधासुरास ब्रह्मांडावर विजय प्राप्त करण्याची इच्छा होती हे जाणून शुक्राचार्यांनी त्यास 
विधीपूर्वक सुर्यमंत्राची दिक्षा प्रदान केली व सुर्यकृपा प्राप्त करण्यासाठी तपश्चर्या करण्यास 
वनात निघून जाण्याचा आदेश दिला.

गुरुंच्या आदेशाप्रमाणे क्रोधासुराने वनात जाऊन अन्नपाणी त्याग करुन, एका पायावर 
उभे राहून सूर्यदेवांच्या कठोर तपश्चर्येस सुरुवात केली. अनेक तपांनंतर क्रोधासुराच्या 
तपश्चर्येवर प्रसन्न होऊन सुर्यदेव प्रकट झाले. क्रोधासुराने सुर्यदेवांकडे वरदान मागितले
देवा, मला संपूर्ण ब्रहृमांड जिंकण्याची अभिलाषा आहे. मृत्यूवरदेखील मला विजय 
मिळवायचा आहे. आपण मला अमरत्व बहाल करावे.सुर्यदेवांनी क्रोधासुरास इच्छित 
वरदान दिले.

वरदान प्राप्त झाल्यानंतर क्रोधासुर ब्रहृमांड जिंकण्यास सज्ज झाला. शुक्राचार्यांनी त्याला 
दैत्यराज पद बहाल केले. 

पृथ्वीवरील सर्व राजांना पराभूत करुन त्याने आपले वर्चस्व प्रस्थापित केले. त्याचप्रमाणे 
वैकुंठ आणि कैलासावर देखील त्याची सत्ता प्रस्थापित झाली. 

क्रोधासुराने सुर्यदेवांवर देखील आक्रमण करुन सुर्यलोक काबिज केले. आपल्याच 
वरदानामुळे आपल्याला सुर्यलोकाचा त्याग करावा लागतोय हे पाहून सुर्यदेवही हताश झाले.

क्रोधासुर सर्वत्र अहंकाराने राज्य करु लागला. त्याच्या त्रासास कंटाळून देवदेवता व 
ऋषिमुनींनी सुखकर्ता - दुखहर्ता भगवान श्री गणेशाची आराधना सुरु केली. त्यांच्या 
आराधनेवर प्रसन्न होऊन भगवान श्री गणेश लंबोदर या अवतारात प्रकट झाले व 
क्रोधासुराच्या त्रासातून मुक्ती मिळवून देण्याचे आश्वासन त्यांनी सर्वांना दिले. ही वार्ता क्रोधासुरापर्यंत पोचली.

इकडे लंबोदराने क्रोधासुरावर आक्रमण केले. उंदिरावर आरुढ झालेला मोठया उदराच्या 
लंबोदराचे तेजस्वी रुप पाहून क्रोधासुर चकीत झाला. 

लंबोदर व क्रोधासुर या दोघांमध्ये तुंबळ युद्ध झाले. एकामागून एक पराक्रमी राक्षस धारातीर्थी 
पडू लागलेले पाहून क्रोधासुर चवताळून लंबोदरास म्हणाला, “मी समस्त ब्रहृमांड जिंकलेले 
आहे. तु माझा काय पराजय करणार.....? मला अमरत्वाची प्राप्ती आहे.यावर लंबोदराने क्रोधासुरास सुनावले, “कोणत्याही वरदानाचा वापर हा धर्म आणि निती यांस अनुसरुन करावयाचा असतो. मात्र वरदान मिळताच तू उन्मत्त झालास. सगळीकडे अराजकता माजविलीस. तुझ्या कृत्यांमुळे प्राप्त वरदानातील शुभता नष्ट झाली आहे. तुझा अंत करण्याकरीताच मी हा अवतार घेतला आहे. तुझ्या गुरुंना सर्व ज्ञात आहे. तु त्यांचेशी विचारविनिमय करु शकतोस. तुझा यापुढे जिवंत रहायचे असेल तर मला शरण ये 
अन्यथा तुझा अंत निश्चित आहे.” 

क्रोधासुराने दैत्यगुरु शुक्राचार्यांना लंबोदराबद्दल विचारले. शुक्राचार्यांनीदेखील त्यास 
लंबोदराच्या अवताराबाबत सविस्तर सांगितले आणि लंबोदरास शरण जाण्याचा सल्ला दिला.

क्रोधासुर लंबोदरास शरण आला व त्याने आपल्या अपराधांची क्षमा मागितली. 
तो लंबोदराची अर्चना व स्तुती करु लागला. त्याच्या भक्तीवर प्रसन्न होऊन लंबोदर प्रकट 
झाले. 

क्रोधासुराने लंबोदराकडे आपल्या अपराधांना क्षमा करण्याची याचना केली. त्यास क्षमा 
करुन लंबोदराने पातालात गमन करण्याचा आदेश दिला. क्रोधासुर लंबोदरास वंदन करुन पातालात निघून गेला. सर्वत्र आनंदाचे वातावरण निर्माण झाले. तिन्ही लोकांमध्ये लंबोदराचा 
जय जय कार होऊ लागला.

बहृमांडावर विजय मिळविलेल्या, क्रोधाग्नीने उन्मत्त झालेल्या आणि सर्व देवदेवता व 
ऋषि-मुनींना त्रास देणाऱ्या असुराच्या क्रोधाचा नाश करुन त्यास सरळ मार्गावर आणणाऱ्या गजाननास प्रणाम असो.......!


भगवान-श्री-गणेशाचे-संपूर्ण अवतार-माहिती-Jai-shri-Ganesh-Ganpati-विघ्नहर्ता-मोरया-गजानन-लंबोदर-गणराया-गणपती
भगवान-श्री-गणेशाचे-संपूर्ण अवतार-माहिती-Jai-shri-Ganesh-Ganpati

श्री विकटावतारा

विकटो नाम विख्यात: कामासुर्विदाहक: ।
मयुरवाहनश्चायं सौरब्रह्मधरा स्मृत: ||


अर्थ : श्रीगणेशाचा विकट हा अवतार सौरब्रह्माधारक असुन, कामासुर संहारक 
आणि मयुर / मोर या वाहनावर आरुढ असा आहे )

भगवान  श्री गणेशाने अष्टावतारापैकी विकटहा सहावा अवतार कामासुर या 
राक्षसाच्या संहाराकरीता घेतला होता.

भगवान  श्री गणेशाच्या शापामुळे एका वृंदानामक कन्येने राक्षसकुळात जन्म घेतला. 
विष्णूभक्त असल्याने ती बालपणापासूनच श्री विष्णूंची नित्यनेमाने पूजा करीत असे. 

उपवर झाल्यावर तिचा विवाह राक्षसकुळातीलच जालंधरनामक महापराक्रमी अशा असुराशी झाला. विष्णूभक्त वृंदा ही अत्यंत धर्मशील व पतिव्रता होती. वृंदाशी विवाह झाल्याने तिचे महापातिव्रत्य व पावित्र्याच्या तेजाने जालंधरास अधिक शक्ती प्राप्त झाल्या व तो सर्वत्र विजय 
प्राप्त करु लागला.

जालंधरास समस्त पृथ्वीवर विजय मिळविण्याची अभिलाषा होती. वृंदेच्या पावित्र्याने व 
पुण्याईने जालंधर त्रिभुवनात अजिंक्य ठरु लागला. त्याने समस्त राक्षस व पृथ्वीलोकांवर 
विजय तर मिळवीलाच पण आता तो देवीदेवता व ऋषीमुनींनाही त्रास देऊ लागला. 
स्वर्गाचा अधिपती होण्यासाठी उन्मत्त जालंधराने देवदेवतांशी युद्ध पुकारले.

जालंधर वआणि देवतांमध्ये घनघोर युद्ध सुरु झाले. वृंदेच्या पातिव्रत्याच्या प्रभावामुळे 
जालंधरावर देवदेवता विजय प्राप्त करु शकत नव्हते. वृंदेचे पातिव्रत्याचा प्रभाव कमी 
केल्यास जालंधराचे सामर्थ्य आपोआप कमी होईल हे श्रीविष्णूं भगवानांनी जाणले. 
परंतु.... वृंदा ही निस्सीम विष्णूभक्त असल्यामुळे श्री विष्णूंसमोर मोठा पेच निर्माण झाला. 
यावर सर्व देवांनी श्री विष्णूस जालंधरामुळे तिन्ही लोकांवर कशा प्रकारे संकट ओढवले आहे 
व धर्म कर्म नष्ट होऊन कशा प्रकारे अधर्म माजत आहे हे पुन:श्च सांगितले. 

तसेच लोककल्याणा करीता वृंदेचे पातिव्रत्य भंग करण्याशिवाय आता कोणताही पर्याय 
नाही हे देखील पटवून दिले. शेवटी श्री विष्णू देवीदेवतांना मदत करण्यास तयार झाले व 
जालंधराचे रुप धारण करुन ते वृंदेचे पातिव्रत्य भंग करण्यास निघाले.

जालंधराचे रुप घेऊन विष्णू वृंदेच्या महालात पोचले. जालंधर रुपी विष्णूंस पाहताच 
आपला पती युद्धात विजयी होऊन परत आला आहे या विचाराने वृंदा त्यांच्या चरणास स्पर्श करण्यास गेली. 
वृंदेने विष्णूंच्या चरणास स्पर्श करताच तिचे पातिव्रत्य भंग पावले. अज्ञानात का होईना पण 
वृंदेच्या पातिव्रता भंगामुळे जालंधरा भोवतीचे संरक्षणकवच नष्ट झाले व त्याक्षणी युद्धात 
देवांनी जालंधरावर विजय मिळविला व जालंधराचे शीर धडापासून वेगळे केले. 

ते शीर वृंदेच्या महाली येऊन पडले. सोबत जालंधररुपी श्री‍ विष्णू असताना जालंधराचे  
शीर अचानक समोर येऊन पडलेले पाहून वृंदा अत्यंत क्रोधीत झाली व तिने जालंधररुपी 
श्रीविष्णूंस जाब विचारला असता विष्णूं आपल्या मूळ रुपात प्रकट झाले.

श्रीविष्णूंना पाहताच सारा प्रकार वृंदेच्या लक्षात आला. आपल्या पतीस पराभूत करण्यासाठी कपटीपणाने व खोट्या वागणूकीतून आपले तप आणि पातिव्रत्याचा भंग करण्यात 
आलेला आहे.... हे समजताच क्रोधीत वृंदेने श्रीविष्णूंना दगड बनण्याचा शाप दिला. 

वृंदेच्या शापाने श्री विष्णूचे तत्काळ एका दगडामध्ये रुपांतर झाले. यामुळे श्रीविष्णूंना 
शाळीग्रामया नावाने ओळखले जाते. श्री विष्णूंना श्रापातून मुक्त करण्यासाठी 
लक्ष्मीसह सर्व देवीदेवतांनी वृंदेकडे प्रार्थना केली. वृंदेने श्रीविष्णूस श्रापातून मुक्त केले 
आणि जालंधरासह सती गेली.

श्री विष्णूंनी जालंधराच्या विनाशाकरीता जालंधरपत्नी वृंदेचे सतीत्व भंग केल्याने 
कामासुरनामक एक तेजस्वी दैत्य निर्माण झाला. त्याने दैत्यगुरु शुक्राचार्यांकडून 
दिक्षा घेतली आणि वनात जाऊन महादेवांची घोर तपश्चर्या सुरु केली. 

त्याच्या तपश्चर्येवर प्रसन्न होऊन महादेवांनी त्यास तिन्ही लोकांवर विजय मिळविण्याचे 
वरदान दिले. कामासुर परत दैत्यलोकात आला. त्यास दैत्यांचा अधिपती करण्यात आले व महिषासुरनाम असुराची कन्या तृष्णाहिच्याशी त्याचा विवाह झाला. 

कामासुर देखील इतर दैत्यांप्रमाणे महादेवांकडून मिळालेल्या वरदानाने उन्मत्त झाला व देवदेवतांवर अत्याचार करु लागला.

कामासुराच्या त्रासातून मुक्तता मिळविण्याकरीता सर्व देवदेवता मुद्गल ऋषींकडे गेले. 
मुद्गल ऋषींना त्यांना मयुरेश क्षेत्री जाऊन विघ्नहर्त्या श्रीगणेशाचे ध्यान करण्यास सांगितले. 

सर्व देवीदेवता मयुरेश क्षेत्री जाऊन आपल्यावर ओढवलेले कामासुर रुपी विघ्न दूर 
करण्यासाठी विघ्नहर्त्या भगवान श्री गणेशाची आराधना करु लागले. 

त्यांच्या आराधनेवर प्रसन्न होऊन भगवान श्री गणेश मोरावर विराजमान होऊन 
विकट स्वरुपात प्रकट झाले. अर्थात, कामासुराच्या संहाराकरीता भगवान श्री गणेशाने 
विकटया रुपात अवतार घेतला व कामासुराच्या त्रासातून सर्वांची मुक्तता होईल 
असा आर्शिवाद दिला.

देवदेवीतांचा नायक बनून भगवान श्री गणेशाने कामासुरा सोबत युद्ध पुकारले. देव आणि दानवांमध्ये तुंबळ युद्ध सुरु झाले. विकटरुपातील भगवान श्री गणेशाने कामासुरास 
ललकारले. 

महादेवांच्या वरदानाने तू तिन्ही लोकांवर सत्ता प्राप्त करण्याच्या प्रयत्नात सगळीकडे 
अधर्म माजवलास. त्यामुळे आता तुझा अंत निश्चित आहे. मला शरण येण्याशिवाय 
तुला पर्याय नाही.यावर कामासुर क्रोधीत झाला व त्याने आपली गदा विकट भगवान श्री
गणेशास फेकून मारली. गदेचा विकट गणेशावर काहीही परिणाम झाला नाही..... 
उलट विकट गणेशाच्या केवळ एका दृष्टिनेच कामासूराच्या सर्व शक्ती लोप पावल्या व तो 
धाडकन मुर्च्छा येऊन पडला. 

सचेतना आल्यानंतर कामासुरास कळून चुकले की विकट गणेशाच्या केवळ एका दृष्टिनेच कोणत्याही शस्त्राविना आपली ही अवस्था झाली आहे. त्यामुळे त्यास शरण गेलेलेच चांगले. घाबरलेला कामासुर विकटाच्या पायावर डोके ठेवून त्याची माफी मागू लागला. 
विकट गणेशाने कामासुरास माफ केले.

महादेवांच्या वरदानाने उन्मत्त झालेल्या आणि सर्व देवीदेवता व ऋषि-मुनींना त्रास देणाऱ्या असुराच्या अहंकाराचा नाश करुन त्यास सरळ मार्गावर आणणाऱ्या विकट गणेशास 
प्रणाम असो....!

भगवान-श्री-गणेशाचे-संपूर्ण अवतार-माहिती-Jai-shri-Ganesh-Ganpati-विघ्नहर्ता-मोरया-गजानन-लंबोदर-गणराया-गणपती
भगवान-श्री-गणेशाचे-संपूर्ण अवतार-माहिती-Jai-shri-Ganesh-Ganpati

श्री विघ्नराजावतारा

विघ्नराजावताराश्च शेषवाहन उच्येत |
ममतासुर हन्तास विष्णुब्रह्मेति वाचकः ||

अर्थ :-  भगवान श्री गणेशाचा विघ्नराज हा अवतार विष्णु ब्रह्मा धारक असुन...... 
ममतासुर संहारक आणि शेषावर विराजमान असा आहे )

भगवान श्री गणेशाने अष्टावतारापैकी विघ्नराजहा सातवा अवतार ममतासुर या 
राक्षसाच्या संहाराकरीता घेतला होता.

देवी पार्वती एकदा आपल्या सख्यां सोबत हास्यविनोद करीत बसली होती. हसता हसता 
अचानक तिच्या हास्यातून एक पर्वतासमान महाकाय राक्षस निर्माण झाला. 

त्याला पाहताच पार्वती व तिच्या सख्या अचंबित झाल्या. देवी पार्वतीने आपल्या हास्यातून 
उत्पन्न झालेल्या या असुराचे नाव ममतासुरअसे ठेवले व त्यास भगवान श्री गणेशाच्या 
षडाक्षर मंत्राची दिक्षा दिली. 

देवी पार्वतीने ममतासुरास शुभार्शिवाद दिले व भगवान श्री गणेशाची भक्तीभावे आराधना व 
इच्छित फलप्राप्तीसाठी तपश्चर्या करण्यास सांगितले. देवी पार्वतीच्या आज्ञेनुसार ममतासुर 
भगवान श्री गणेशाच्या आराधने करीता वनात निघून गेला. 

वनात जात असतांना त्याची शंबरासुर नावाच्या असुराची भेट झाली. ममतासुर व शंबरासुर 
हे दोघेही पहिल्या भेटीतच एकमेकांचे मित्र झाले. ममतासुराने त्यास आपल्या जन्माचा वृत्तांत सविस्तर कथन केला. तसेच त्याची समस्त ब्रह्मांडावर राज्य करण्याची मनिषा आहे हे देखील सांगितले. त्यानंतर शंबरासुराने ममतासुरास त्याची मनिषा पुर्ण करण्याकरीता सर्वोतोपरी 
मदत करण्याचे वचन दिले.
 
शंबरासुर ममतासुरास असुरांच्या राज्यात घेऊन गेला. शंबरासुराचा जन्म कसा झाला व 
त्याची ब्रम्हांडावर विजय मिळविण्याची प्रबल इच्छा जाणून सर्व असुरांच्या देवांवर विजय मिळविण्याच्या आशा पल्लवीत झाल्या. 

शंबरासुर व इतर असुरांनी ममतासुरास अनेक असुरी विद्या शिकविल्या. लवकरच ममतासुर 
असुरी विद्यांमध्ये पारंगत झाला. मग शंबरासुराने त्याला ब्रह्मांडावर विजय प्राप्त करण्याचा 
हेतू साध्य करण्याकरीता श्रीगणेशाची तपश्चर्या करण्याचे सुचविले.

ममतासुराने वनात जाऊन भगवान श्री गणेशाची घोर तपश्चर्या सुरु केली. हजारो वर्षे त्याची तपश्चर्या अविरत सुरु होती. अनेक युगे उलटल्यानंतर भगवान श्री गणेश प्रकट झाले व ममतासुराच्या तपश्चर्येवर प्रसन्न होऊन त्यांनी त्यास वर मागण्यास सांगितले. 

ममतासुराने आपली ब्रह्मांडावर विजय प्राप्त करण्याची मनिषा गणेशासमोर व्यक्त केली. 
आपला ब्रह्मांडावर विजय प्राप्त करण्याचा हेतू निर्विघ्न पार पडावा असा वर ममतासुराने 
मागितला. भगवान  श्री गणेश तथास्तू म्हणून अंतर्धान पावले.

भगवान श्री गणेशा कडून आपणांस इच्छित वर मिळाला ही आनंदाची बातमी आपला मित्र शंबरासुरास देण्याकरीता ममतासुर त्याच्या भेटीस निघाला. शंबरासुर, असुरांचे गुरु शुक्राचार्य 
व इतर असुरांना प्रत्यक्ष भेटून ममतासुराने सर्व वृत्तांत कथन केला. 

संपुर्ण असुर राज्य आनंदाने जल्लोष साजरा करु लागले. ममतासुरास विविध अलंकार व 
शस्त्रास्त्रे भेटस्वरुपात देण्यात आली. असुरांचे गुरु शुक्राचार्य यांनी त्यास असुरांचा राजा 
घोषीत केले. याच प्रसंगी शंबरासुराने आपली कन्या ममतासुरास अर्पण करुन तिचा 
पत्नी म्हणून स्वीकार करण्याची विनंती केली. 

ममतासुराचा विवाह शंबरासुराच्या कन्येशी झाला. इच्छित वर प्राप्ती, असुरराज पदाचा 
राज्याभिषेक व असुरकन्येशी विवाह या सर्वांनी ममतासुर भारावून गेला. 
आनंदाच्या भरात त्याने ब्रह्मांडावर विजय प्राप्त करण्यासाठी युद्धाची घोषणा केली.

असुरराज ममतासुराने तिन्ही लोकांशी युद्ध पुकारले. भगवान श्री गणेशाच्या आर्शीवादामुळे 
त्याच्या मार्गात कोणतेही विघ्न आले नाही व त्याने ब्रम्हांडावर विजय मिळविला. पृथ्वी, पाताळ आणि स्वर्ग तीनही लोक ममतासुरास शरण गेले. ममतासुर आपल्या विजयाने उन्मत्त झाला. 

त्याने देवीदेवता व ऋषिमुनींचा छळ सुरु केला. यज्ञ-याग बंद झाले व असुरांचे राज्य सुरु झाले. सगळीकडे हाहाकार माजला. देवीदेवता व ऋषिमुनींनी विघ्नराज भगवान श्री गणेशाकडे धाव घेतली. समस्त ब्रम्हांडास उन्मत्त ममतासुरापासून वाचविण्याकरीता प्रार्थना करु लागले.
भगवान  श्री गणेशाने त्यांची विनंती मान्य केली व नारद मुनींना आपला दूत म्हणून 
ममतासुराकडे पाठविले.

नारदमुनींनी ममतासुराने आपला उन्माद थांबवून श्रीगणेशास शरण येण्याचा संदेश दिला. 
पण उन्मत्त ममतासुराने मी कोणासही शरण येणार नाही असे सांगून नारदमुनींचा 
अवमान केला. 
भगवान श्री गणेश अत्यंत क्रोधीत झाले व विघ्नराज रुपात प्रकट झाले. शेषनागावर 
विराजमान विघ्नराज गणेशाच्या हातात कमळाचे फूल होते. त्यांनी आपल्या हातातील कमळ असुरांच्या राज्यावर भिरकावले. त्या कमळाच्या केवळ सुगंधाने सर्व असूर मुर्छीत झाले. हे 
बघून ममतासुराचा अहंकार गळून पडला आणि तो भितीने थरथर कापू लागला. 

ममतासुर विघ्नराज गणेशास शरण आला. त्यांच्याकडे क्षमायाचना करु लागला. विघ्नराज गणेशाने त्यास क्षमा केली व पाताळात जाऊन वास्तव्य करण्यास सांगितले. 
ममतासूर पाताळात निघून गेला व ब्रम्हांडावरील असुरांचे राज्य संपुष्टात आले. 
सर्व देवीदेवता व ऋषिमुनी विघ्नराज श्रीगणेशाची स्तुती गाऊ लागले. 

अशा प्रकारे विघ्नराज भगवान श्री गणेशाने ममतासुराचा अहंकार नष्ट करुन ब्रम्हांडास 
असुरांच्या त्रासातून वाचविले.

भगवान श्री गणेशाच्या वरदानाने उन्मत्त झालेल्या आणि सर्व देवदेवता व ऋषि-मुनींना 
त्रास देणाऱ्या असुराच्या अहंकाराचा नाश करुन त्यास सरळ मार्गावर आणणाऱ्या 
विघ्नराज भगवान श्री गणेशास प्रणाम असो.....!

भगवान-श्री-गणेशाचे-संपूर्ण अवतार-माहिती-Jai-shri-Ganesh-Ganpati-विघ्नहर्ता-मोरया-गजानन-लंबोदर-गणराया-गणपती
भगवान-श्री-गणेशाचे-संपूर्ण अवतार-माहिती-Jai-shri-Ganesh-Ganpati

श्री धुम्रवर्णावतारा

धूम्रवर्णावताराश्चभिमानसुरनाशक: ।
आखुवाहन एवासौ शिवात्मा तु स उच्यते: ।।


धुम्रवर्ण अवतार अभिमानासुराचा नाश करणारा आहे. तो शिवब्रह्म स्वरूप आहे. 
त्याला मूषक वाहन असेही म्हटले जाते.

लोक पितामहाने सहस्त्रांशुला कर्मराज्याच्या अधिपती पदावर नियुक्त केले. राज्यपद प्राप्त 
झाल्यावर सूर्यदेवाच्या मनात अहंकार उत्पन्न झाला. ते विचार करू लागले की...... 
कर्माच्या प्रभावाने पितामह सृष्टीची रचना करतात.....! कर्मामुळेच विष्णू भगवान 
जगताचे पालन करतात...! कर्माद्वारे शिवसंहार समर्थ आहे. संपूर्ण जग कर्माधीन आहे 
आणि मी त्यांचा संचालक आहे. सर्वजण माझ्या अधीन आहेत. " असा विचार करता करता त्यांना शिंक आली आणि त्या शिंकेमधून एक महाकाय पुरूष उत्पन्न झाला. 

तो पुरूष दैत्यगुरू शुक्राचार्याकडे गेला. तेव्हा शुक्राचार्यांनी त्याला परिचय विचारला असता 
त्याने सांगितले की माझा जन्म सूर्यदेवाच्या शिंकेपासून झाला आहे. मी अनाथ व अनाश्रित 
असून मला तुम्ही आश्रय द्या. आपल्या प्रत्येक आज्ञेचे मी पालन करील.

हे ऐकून शुक्राचार्य थोडा वेळ ध्यानग्रस्त झाले आणि म्हणाले 'तुझा जन्म सूर्याच्या अहंभावामुळे झाला आहे म्हणून तुझे नाव 'अहम' असे ठेवण्यात आले आहे. तू तपस्या करून शक्ती प्राप्त कर 
एवढे सांगून दैत्य गुरूने त्याला गणेशाचा षोडाशाक्षर मंत्र आणि जप विधी दिला.

अहम् जंगलात जाऊन उपवास करत गणेश मंत्राचा जप करू लागला. त्याची कठोर तपस्या 
पाहून प्रत्यक्षात मूषक वाहन, गजानन, त्रिनेत्र, एकदंत प्रकट झाले. त्यांना आपल्या समोर 
पाहून त्याने प्रणाम केला. संतुष्ट होऊन लंबोदर त्याला म्हणाले, " मी तुझे तप आणि स्तवन पाहून प्रसन्न झालो. तुला जो वर मागायचा असेल तो वर मला माग......!"

अहम् ने प्रभूला हात जोडून ब्रम्हांडाचे राज्य आणि आरोग्याचा वर मागितला. 'तथास्तू
म्हणत गणराय अंतर्धान पावले. अहम् आनंदाने आपल्या गुरूकडे गेल्यावर त्यांनी त्याचे 
कौतुक केले. गुरू शुक्राचार्यांनी त्याला दैत्यधीशपदी नियुक्त केले. त्याने विषयप्रिय नावाचे 
एक सुंदर नगर निर्माण केले. अहम् तिथेच असुरांबरोबर राहू लागला. नंतर प्रमादासुराची 
कन्या ममताशी त्याचा विवाह झाला.

काही दिवसांनतर त्याला गर्व आणि श्रेष्ठ नावाचे दोन मुले झाले. त्याचे सासरे प्रमादासुर 
यांनी ब्रह्मांडावर विजय प्राप्त करून सुख उपभोगायचे त्याला सांगितले. अहम्ला आपल्या 
सासऱ्याचे म्हणणे पटले. मग शुक्राचार्यांचा आशीर्वाद घेऊन आपल्या सैन्यासह विजयी 
घोडदौड सुरू केली.

त्याने पाताळावरही आक्रमण केले. परम प्रतापी अहंतासुराच्या भीतीपोटी शेषाने त्याला कर 
देण्यास सुरवात केली. नंतर स्वर्गावर आक्रमण केले विष्णूला असुरांच्या अमोघास्त्रासमोर 
पराभूत व्हावे लागले. सर्वत्र अहंकासुराचे अधिपत्य झाले होते. देव, ऋषी जंगलात लपून राहत 
होते. अहंतासुर मद्य आणि मांस सेवन करत असे.

तो मनुष्य, नाग आणि देवतांच्या कन्यांवर बलात्कार..... अपहरण करून त्यांचे शीलहनन 
करत असे. अशा प्रकारे सगळीकडे पापाचे राज्य निर्माण झाले होते. जंगलात लपलेल्या देवता
ऋषी यांचे यज्ञ मोडून काढणे. तसेच जंगल नष्ट करण्याचा आदेश त्याने दिला. त्यामुळे देवता
ऋषी, मनुष्य सर्वजण भयभीत झाले. मंदिरामध्ये देवाच्या जागी असुरांच्या मूर्ती बसविण्यात 
आल्या होत्या.

या भयानक त्रासाला कंटाळून ब्रह्मा, विष्णू आणि शिव यांनी एकत्र येऊन गणेशाची आराधना करण्यास सुरवात केली. त्यांची आराधना पाहून धूम्रवर्ण प्रकट झाले. सर्व देवतांनी त्यांना 
प्रणाम केला आणि अहंतासुराच्या अत्याचारापासून मुक्ती मिळवून देण्याची विनंती केली. 

दुसऱ्या दिवशी रात्री धूम्रवर्ण अहंतासुराच्या स्वप्नात गेला. आपल्या दिव्य रूपाची जाणीव 
त्याला करून दिली.

नंतर त्याने सकाळी अहंतासुराने असुरांना आपल्या स्वप्नाविषयी सांगितले. तो म्हणाला की... 
मी धूम्रवर्णाला प्रत्यक्ष पाहिले आहे. त्यांचे डोळे रागाने लालबुंद झालेले होते. आपले संपूर्ण राज्य जाळून भस्म केले आणि आपण सर्व अशक्त झाल्याचे पाहिले. देवगण स्वतंत्र होऊन धर्ममय 
जीवन व्यतीत करू लागले आहेत. असुरांनी त्याला स्वप्नावर विश्वास ठेवू नका.
तुम्हाला वर प्राप्त झालेला आहे. तुम्हाला घाबरायचे काहीही कारण नाही, असे सांगितले. 

स्वप्नाचा प्रभाव न पडल्याचे पाहून धूम्रवर्णाने महर्षी नारदाला संदेश घेऊन अहंतासुराकडे 
पाठविले. नारदाने अहंतासुराला धूम्रवर्ण गणेशाला शरण येण्याचे सांगितले अन्यथा तुझा 
सर्वनाश केला जाईल, असा इशाराही दिला. तेव्हा अहंतासुर अत्यंत क्रोधित झाला. 

तिकडे देवगण धूम्रवर्णा जवळ प्रार्थना करू लागले. तेव्हा धूम्रवर्णाने देवतांना सागितले 
तुम्ही इथेच बसून माझी लीला पाहा. मी अहंतासुराचा वध करतो.

प्रभूने आपले उग्र रूप धारण केले आणि जिथे असुर दिसेल तिथे त्याला ठार करत असे. हे पाहून 
सर्व असूर भयभीत झाले. अहंतासुर अत्यंत व्याकूळ झाला. त्याच्या पुत्राने त्याला धीर दिला 
आणि म्हणाले आम्ही असतांना तुम्हाला काळजी करायची गरज नाही. 
मायायुक्त धुम्रवर्ण काहीच करू शकणार नाही.....? एवढे म्हणून गर्व आणि श्रेष्ठ दोघांनी 
पित्याच्या चरणी प्रणाम केला आणि आपल्या सशस्त्र सैनिकांसह युद्धभूमीवर पोहचले.

अमित तेजस्वी ज्वाळात ते सर्वजण जळून गेले. हे सर्व पाहून अहंतासुर अत्यंत व्याकूळ झाला. 
तो शुक्राचार्याकडे गेला आणि त्यांना धूम्रवर्णापासून रक्षण करण्याची विनंती केली. 
तेव्हा शुक्राचार्यांनी त्याला समजाविले आणि धूम्रवर्णाला शरण जाण्याचे सांगितले. 

नंतर अहंतासुर धूम्रवर्णाला रणांगणात शरण आला आणि क्षमेची याचना करू लागला. 
प्रभूने त्याला क्षमा करून त्याला आपला भक्त मानले. त्याने प्रभुला प्रणाम केला आणि 
शांत जीवन व्यतीत करण्यासाठी पाताळात निघून गेला.

भगवान  श्री गणेशाच्या वरदानाने उन्मत्त झालेल्या आणि सर्व देवीदेवता व ऋषि-मुनींना त्रास देणाऱ्या अहंतासुराच्या अहंकाराचा नाश करुन त्यास सरळ मार्गावर आणणाऱ्या आणि 
श्री गणेशास प्रणाम असो....!

आधार : श्री मुद्गल महापुराण संग्रहीत.

मंगलमुर्ती मोरया गणपती बाप्पा मोरया 

साभार 

Post a Comment

0 Comments